
तीन आरोपी ताब्यात ; स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांची कारवाई
गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत गांजा वाहतूक करणाऱ्या तिघांना शुक्रवारी (दि. १७) दुपारी २:४० वाजताच्या दरम्यान रामनगर परिसरातून ताब्यात घेतले.
दोघे आरोपी ओडिशा येथून रायपूर रेल्वे मार्गाने गांजा घेऊन रामनगर परिसरात येणार आहेत, अशी खात्रिशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस पथक कारवाईसाठी लागणारे आवश्यक सर्व साहित्य, शासकीय पंच, मापारी, फोटोग्राफर, पोलिस कर्मचारी सोबत घेऊन रवाना झाले. रेलटोली परिसरातील मालधक्का येथील हनुमान मंदिर समोरील गोंदिया ते बालाघाट जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला अवैधरीत्या गांजाची खेप घेऊन एका विधीसंघर्ष बालकासह आलेल्या युवकाला दुपारी २:४० वाजताच्या दरम्यान रंगेहात पकडले. त्या दोघांजवळून निळ्या व ग्रे रंगाच्या स्कूल बॅगमध्ये सेलोटेपने गुंडाळलेले आठ बंडल मिळाले. वेष्टण असलेल्या बंडलची पंचासमक्ष खोलून पाहणी केली असता, त्यात हिरवा ओलसर पाने, फळे, फुले आणि बिया मिश्रीत एकूण आठ किलो ३२५ ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला.
पथकाने गांजाच्या दोन बॅग जप्त केल्या असून, त्यात एक लाख ६७ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा होता. या प्रकरणात देवेंद्रा धनेश्वर बेहरा (४८, रा. कादलिमुंडा, ता. किशोरनगर, जि. अंगुल-उडिशा) व माहुलमुंडा साही, कादलिमुंडा येथील १७ वर्षांचा एक विधीसंघर्ष बालक यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर सहायक पोलिस निरीक्षक धीरज राजूरकर यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २०, २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, रामनगरचे प्रविण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात सपोनि. राजूरकर, पोलिस उपनिरीक्षक शरद सैदाने, हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, नेवालाल भेलावे, भूवनलाल देशमुख, सुजित हलमारे, संतोष केदार, दुर्गेश पाटील, चालक पोलिस शिपाई घनश्याम कुंभलवार, रामनगरचे पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमोडे, सहायक फौजदार राजेश भुरे, हवालदार सुनीलसिंह चौहान, सरोज घरडे, शिपाई कपिल नागपुरे, चालक शिपाई श्याम फुंडे यांनी केली.



