
कोनसरी येथे लॉयड्सच्या लोहखनिज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी जनसुनावणी ; माजी खा. नेते यांची उपस्थिती
गडचिरोली : गडचिरोलीचा कायापालट व मागासलेला जिल्हा म्हणून ओळख पुसत जिल्हा आता विकासाचे नवे मॉडेल बनेल. कोनसरी प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला की, गडचिरोली जिल्हा भविष्यात “पोलाद सिटी” म्हणून ओळखला जाईल. प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील व जिल्ह्याचा औद्योगिक विकास वेगाने होईल, असे प्रतिपादन माजी खा. अशोक नेते यांनी केले.
कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या लोहखनिज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २३ जानेवारी रोजी प्रकल्पस्थळी जनसुनावणी आयोजित केली. या महत्त्वपूर्ण जनसुनावणी कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
पुढे बोलताना माजी खा. नेते म्हणाले, लॉयड्स मेटल्स प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक असून, पर्यावरण व जैवविविधतेचे रक्षण करून प्रकल्प शाश्वत विकासाला प्रोत्साहन देईल, या प्रकल्पाच्या यशामुळे गडचिरोली जिल्हा देशाच्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे दिसेल, अशी आशा व विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी लॉयड्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रकल्पाच्या प्रभावाखालील नागरिकांचा सहभाग : कोनसरी व आसपासच्या गावांतील नागरिकांनी या सुनावणीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या विचारांची मांडणी केली. पर्यावरण, रोजगार व प्रकल्पाच्या परिणामांबाबत त्यांनी आपले मत मांडले.
लॉयड्स प्रकल्पाच्या विस्तारीकरणात स्टील प्लांटची क्षमता 2 बाय 4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष (ग्राईंडिंग युनिट), 10 दशलक्ष टन प्रतिवर्ष (थिकनिंग फिल्ट्रेशन युनिट), 2 बाय 4 दशलक्ष टन प्रतिवर्ष (आयरन ओर पेलेट प्लांट), तसेच 4.5 दशलक्ष टन क्षमतेचा इंटिग्रेटेड स्टील प्लांट उभारण्याचा प्रस्ताव आहे.



