
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासनाच्या वतीने संत संत तुकाराम जन्मोत्सवानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी “संत तुकारामांचे शब्द सामर्थ्य” या विषयावर बोलताना प्राचार्य डॉ. शांताराम बुटे म्हणाले की, संत तुकारामांची अभंगरचना सामान्य माणसाच्या हृदयाला भिडणारी असून आजही जनमानसाच्या कल्याणाची आहे.
संत तुकारामाचे जन्मोत्सव आयोजन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाने केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास सिनेट सदस्य डॉ. दिलीप चौधरी, डॉ. संजीव कोंडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. हेमराज निखाडे यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन डॉ. सविता गोविंदवार यांनी केले. आभार अमित गजबिये यांनी मानले.
प्राचार्य डॉ. बुटे म्हणाले, “संत तुकारामांचे अभंग हे समाजप्रबोधन, भक्ती आणि तत्त्वज्ञान यांचे अद्वितीय मिश्रण आहेत. त्यांच्या शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य असून, ते सामान्य माणसाच्या हृदयाला भिडतात आणि त्याच्या जीवनात परिवर्तन घडवतात. त्यांच्या अभंगांमधील सहजता, गेयता आणि विचारसंपन्नता यामुळे ते जनमानसावर अमिट ठसा उमटवतात.”
या कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.



