गडचिरोलीविदर्भ

डॉ. आंबेडकरांवर माथेफिरूंकडून आक्षेपार्ह लिखाण ; आंबेडकरी संघटना आक्रमक

आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली येथील बसथांब्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अज्ञात व्यक्तीने आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने सोमनपल्ली, गडचिरोली आणि आष्टी येथे आंबेडकरी संघटनांनी आज निदर्शन करीत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी-आष्टी मार्गावरील सोमनपल्ली येथील बसथांब्यावर तसेच आंबोली येथील शाळेच्या भिंतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ करणारे विधान लिहिल्याचे आढळून आले. ही वार्ता पसरताच आझाद समाज पार्टीच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. त्यानंतर पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. सोमनपल्ली येथे मुनीश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनीही आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

गडचिरोली येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी अविशांत पंडा व पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात आरोपीस अटक करण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button