माजी खा. नेते यांनी घेतली वनमंत्री नाईक यांची भेट

जिल्ह्यातील विविध समस्या आणि विकासात्मक विषयांवर केली चर्चा
गडचिरोली : माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी मुंबई येथे वनमंत्री गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्या आणि विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे आणि कढोली येथील सामाजिक नेते पिंटू आकरे उपस्थित होते. आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी वनसंपत्तीच्या शाश्वत वापरासह विविध योजनांवर विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीत जंगल व्यवस्थापन, स्थानिक जनतेसाठी रोजगाराच्या संधी, पर्यावरणपूरक औद्योगिक प्रकल्प, तसेच वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मंत्री गणेश नाईक यांनी या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्याच्या अधिकृत दौऱ्यावर आपण यावे, अशी विनंती माजी खा. नेते यांनी वनमंत्री नाईक यांच्याकडे केली. मंत्री महोदयांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
ही बैठक गडचिरोलीच्या विकास प्रक्रियेत एक मोठे पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



