
चातगाव : ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत नवा अध्याय रचत, माँ दंतेश्वरी रुग्णालय, गडचिरोली येथे २० ते २१ मार्च २०२५ या कालावधीत सर्च आणि दि स्पाईन फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मणक्यांच्या आजारांवरील शस्त्रक्रिया शिबिरात केवळ दोन दिवसात २७ यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या.
या शिबिरात देशातील ख्यातनाम स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई आणि नागपूर येथून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी भाग घेतला. सहभागी तज्ज्ञांमध्ये स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज, डॉ. रघुप्रसाद वर्मा, डॉ. समीर कोलकटवार, डॉ. जयेश भानुशाली, डॉ. शीतल मोहिते, डॉ. विश्वनाथ कांबळे, डॉ. शिद्देश्वर ठोसर, भूलतज्ज्ञ डॉ. शुभम पेटकर, डॉ. प्रतीक सांगडे, डॉ. विष्णुप्रिया फिजिओथेरपिस्ट डॉ. गौरिष केंकरे याशिवाय, सर्च रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ. दत्ता भलावी आणि प्रकल्प समन्वयक पंकज भागडकर, तसेच संपूर्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
दोन दिवस चाललेल्या या शिबिरात शस्त्रक्रिया झालेल्या सर्व २७ रुग्णांना त्यांच्या वेदनांपासून दिलासा मिळवला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाला ब्लँकेट देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना नियमित फिजिओथेरपी उपचार देऊन पुन्हा दैनंदिन जीवनात सक्षम करण्यात येत आहे. मणक्याच्या दुखण्याच्या त्रासाने पीडित व जीवन असह्य झालेले रुग्ण शस्रक्रियेच्या चमत्काराने जीवनात नवीन आशा घेवून जात आहेत. सर्च रुग्णालयात मान, पाठ, कंबरदुखी, संधिवात, अस्थिरोग या त्रासांसाठी अद्यावत फिजिओथेरपी विभाग कार्यरत असून याची ख्याती सर्वदूर पसरत आहे.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील मणके आणि सांधेदुखीच्या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना मुंबई सारख्या मोठ्या शहरात जाऊन ही सेवा घेणे शक्य होत नाही म्हणून अश्या आजारासाठी सर्व सोयींनी अद्यावत अश्या माँ दंतेश्वरी रुग्णालय गडचिरोली या ठिकाणी अत्यल्प दरात मुंबई व नागपूर येथील नामांकित रुग्णालयातील तज्ञ सर्जन येवून समाजाप्रती असलेले ऋण व्यक्त करून सेवाभावी वृत्तीने सेवा देत आहेत. वर्ष भरात १०० शस्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असून पुढील शस्रक्रिया शिबीर जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी लवकर नोंदणी करण्याचे आवाहन सर्चचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता भलावी आणि संचालिका डॉ. राणी बंग यांनी केले आहे.
स्पाईन सर्जरी शिबीर यशस्वी केल्याबद्दल सर्चचे संचालक डॉ. अभय बंग यांनी सर्व टिमचे अभिनंदन केले.



