
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील वडधा येथील बाबुरावजी पाटील भोयर महाविद्यालयात मुक्तिपथ व वडधा गावसंघटना यांचे वतीने १४ गावातील मुक्तिपथ-शक्तिपथ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी संबंधित गावातील एकूण ४७ जणांनी सहभाग घेत आपल्या गावातून अवैध दारूविक्री बंद करण्यासह आपल्या मुलांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना जाणून घेतल्या.
शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत वडधाच्या सरपंच प्रिया गेडाम यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी वि.टी. गडपायले, डॉ. भोयर, ग्रामपंचायत सदस्य भूपेश कोलते, पोलीस पाटील माधुरी सहारे, सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे, मुक्तीपथ सहसंचालक संतोष सावळकर, राकेश ढवळे, प्रकाश देशमुख, मुक्तीपथ तालुका संघटक विनोद कोहपरे, उपसंघटक मनिषा प्रधान प्रामुख्याने उपस्थित होते.
पहिल्या दिवशी खेळ, गट कृती कार्यक्रम, गावाचा दारूबंदीचा अनुभव, अडचणी, उपाययोजना इत्यादी विषयावर सामूहिक चर्चा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी कुरुंझा व देलोडा बुज येथे अहिंसक कृती करून १२ लिटर दारू नष्ट करण्यात आली. दारू विक्रेत्यांना अवैध्य दारूविक्री बंद करण्यासाठी ताकिद दिली. दुसऱ्या दिवशी गीत, सिंहावलोकन, शब्द बहाद्दर खेळ, नेतृत्व गुण, गाव संघटन म्हणजे काय? गाव संघटन व शक्तिपथ संघटन कसे मजबूत करता येईल, त्यासाठी काय करायला पाहिजे यावर शिबिरात चर्चा करण्यात आली. गावानुसार गट पाडून कृती कार्यक्रम काय घेऊ शकाल यावर चर्चा, कृती कार्यक्रम फोटो, व्हिडिओज दाखविली व त्यावर चर्चा केली. यावेळी मुक्तीपथ सहसंचालक संतोष सावळकर, सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे, मुक्तीपथ तालुका संघटक विनोद कोहपरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून संघटन म्हणजे काय? गावात दारूविक्री बंदी साठी संघटन मजबूत असणे आवश्यक का आहे. गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी काय कृती करता येईल. अडचणी येतात, त्या कशा पार केल्या पाहिजे. शाळेत शिकणारे किंवा घरी असलेले मुले मुली यांनी खर्रा, तंबाखू सेवन करू नये यासाठी काय कृती करता येईल. पालक म्हणून आपण काय केले पाहिजे. लहान मुलाला खर्रा विकल्यास विक्रेत्याला काय शिक्षा होऊ शकते. कोटपा कायदा काय आहे. आदी मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्तिपथ तालुका संघटक विनोद कोहपरे, उपसंघटक मनीषा प्रधान, मुक्तिपथ तालुका प्रेरक स्वीटी आकरे, वडधा मुक्तीपथ गावसंघटन व शक्तिपथ स्त्री संघटना पदाधिकारी शारदा सहाकाटे, संगीता कोसरे, शारदा मेश्राम, ताराबाई पूर्वे, वनिता सहाकाटे, रूपाली रामटेके, पुष्पा सहाकाटे, वनिता चापले, मंदा नवघरे, प्रतीक्षा सहाकाटे, आशिका चुधरी, चंद्रकला सयाम, मंजुषा रोहनकर, सरिता नवघरे, वनिता मेश्राम, वच्छला ठाकरे, संगीता कोसरे, रेखा राऊत, दिपाली पूर्वे, माया ठाकूर, मनीषा चापले, वर्षा नवघरे, कांता चापले, सरस्वता ठाकरे यांनी प्रयत्न केले.



