गडचिरोलीविदर्भ

10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक रा. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोली येथे शनिवार, 10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली आणि अहेरी तसेच अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा आणि सिरोंचा येथील तालुका न्यायालयांमध्ये होणार आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीत गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र फौजदारी आणि दिवाणी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने तडजोडीद्वारे निकाली काढली जाणार आहेत. यामध्ये फौजदारी आणि दिवाणी दावे, कलम 138 एन.आय. अ‍ॅक्ट प्रकरणे, भूसंपादन, कौटुंबिक वाद, मोटार वाहन अपघात दावे, बँक, टेलिफोन, मोबाइल कंपनी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण, पतसंस्था, नगर परिषद आणि ग्रामपंचायत कर आकारणीशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. लोकअदालतीद्वारे प्रकरणे जलद निकाली निघत असल्याने पक्षकारांचा वेळ, श्रम आणि पैशांची बचत होते. तसेच दोन्ही पक्षकारांमधील वैर कमी होऊन मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात. लोकअदालतीत पारित अवॉर्डची अंमलबजावणी न्यायालयाच्या हुकुमाप्रमाणे केली जाते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष, सचिव आर.आर. पाटील आणि सर्व सदस्यांनी पक्षकार, अधिवक्ते आणि नागरिकांना या लोकअदालतीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button