गडचिरोलीविदर्भ

मार्क्सवादच गरिबांचे दारिद्र्य दूर करु शकतो – काॅ. अमोल मारकवार

गडचिरोली : जगातील दारिद्र आणि शोषणाच्या व्यवस्थेत सामान्य माणूस दुखा: ने ग्रासला आहे. भांडवलशाहीला ललकारून श्रमिकांना समानतेची संधी मिळू शकते हा मंत्र काॅम्रेड कार्ल मार्क्स यांनी दिला आहे. सध्या जगभरात भांडवलशाहीने उच्चत्तम स्थिती प्राप्त केली असून श्रमीकांच्या वाट्याला पराकोटीच्या दारिद्र्याचे सावट आलेले असून आता मार्क्सवादच गरिबांचे दारिद्र्य दूर करू शकतो, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित काॅम्रेड कार्ल मार्क्स यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते तर  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. सचिन मोतकुरवार, काॅ. सचिन जक्कुलवार, आझाद समाज पक्षाचे नागसेन खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

गर्दी जमवून, शस्त्रे हातात घेवून निरपराधांना मारून टाकण्याचे तत्वज्ञान काॅम्रेड कार्ल मार्क्स यांनी कधीच सांगितले नसून श्रमिकांना त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा, कलेचा आनंद आणि जगण्यातली सामाजिक समानता मिळण्यासाठी अभ्यासपूर्ण वर्ग संघर्ष उभा करण्याचे शास्त्रोक्त तत्वज्ञान जगाला दिले असल्याचे मत भाई रामदास जराते यांनी व्यक्त केले.

महान तत्त्ववेत्ता,वैचारीक क्रांतिकारक काॅम्रेड कार्ल मार्क्स यांचा जन्मोत्सव शेतकरी कामगार पक्षातर्फे संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याअनुषंगाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पक्षाच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयात काॅम्रेड कार्ल मार्क्स यांचा २०७ वा ‘जन्मोत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी ‘मार्क्स कोण होता?’ याविषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येवून कार्यकर्त्यांना बिर्याणीचे भोजनदानही करण्यात आले.

दरम्यान अमरावती येथे नुकताच झालेल्या अधिवेशनात ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षपदी काॅम्रेड सचिन मोतकुरवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते, डंबाजी भोयर, रामदास आलाम, अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, चिरंजिव पेंदाम, अभिलाषा मंडोगडे, छायाभोयर, रजनी खैरे, योगाजी चापले, मुरलीधर गोटा, धारा बन्सोड, नूतन वेळदा, ऊषा बावणे, संदेशा दरडे, शिल्पा लटारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button