क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई : १.२० लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

गडचिरोली : पोलिसांनी १९ मे रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील दामेश्वर गावात अंमली पदार्थ विरोधी एक मोठी मोहीम यशस्वी केली. या मोहिमेत सुमारे १.२० लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहन यशवंत कोवाची (वय ४२) असे आरोपीचे नाव आहे.

१९ मे २०२५ रोजी मालेवाडा पोलिसांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, दामेश्वर येथील मोहन कोवाची याने त्याच्या राहत्या घरी बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ (गांजा) बाळगला असून तो विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवला आहे. या माहितीची गंभीर दखल घेत, उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा, रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक पथक तयार करण्यात आले. या पथकात पोस्टे कोरचीचे पोलीस निरीक्षक शैलेद्र ठाकरे आणि पोमकें मालेवाडाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पायघन यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

पथकाने दामेश्वर येथील मोहन कोवाची याच्या घरी पोहोचून कायदेशीर प्रक्रियेस अनुसरून पंचांसमक्ष त्याच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान, त्याच्या घरामध्ये चार पिवळसर-पांढऱ्या, हिरवट-करड्या रंगाच्या पिशव्यांमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ (गांजा) आढळून आला.

पंचांसमक्ष केलेल्या तपासणीत, दोन रेघट हिरवट रंगाच्या पिशव्यांमध्ये २८.०५० किलोग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. जप्त केलेल्या या गांजाची अंदाजित किंमत रु. १,१२,२४०/- (एक लाख बारा हजार दोनशे चाळीस रुपये) इतकी आहे. आरोपी मोहन कोवाचीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने विक्री करण्याच्या उद्देशाने हा अंमली पदार्थ स्वतःच्या शेतात उगवला असल्याची कबुली दिली.

याप्रकरणी, आरोपीविरुद्ध पुराडा पोलीस स्टेशनमध्ये २० मे रोजी अप. क्र. ००५९/२०२५, कलम ८ (सी), २० (बी) (ii) (सी) गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोमकें मालेवाडाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पायघन हे करत आहेत.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोस्टे कोरचीचे पोनि. शैलेन्द्र ठाकरे, पोमकें मालेवाडाचे प्रभारी अधिकारी पोउपनि. आकाश नाईकवाडी, पोउपनि. अभिजीत पायघन, मसफौ. मंडपे, पोहवा/मळकाम, मपोहवा./म्हशाखेत्री, पोना/हुंडरा आणि पोअं/साजन मेश्राम यांनी मोलाची कामगिरी बजावली.

गडचिरोली जिल्ह्यातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस दलाची ही धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button