
गडचिरोली : देशभक्तीचे प्रेरणास्थान ठरलेल्या “ऑपरेशन सिंदूर” या ऐतिहासिक मोहिमेच्या सन्मानार्थ माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली केवळ एक सोहळा नसून, भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांना समर्पित एक राष्ट्रभक्तीपूर्ण वंदना होती.
“ऑपरेशन सिंदूर” या मोहिमेच्या गौरवार्थ आयोजित या तिरंगा रॅलीच्या प्रारंभीच आकाशात काळे ढग दाटून आले आणि वरुणराजानेही जोरदार सरींची बरसात केली. मात्र, हा पाऊस कुठलाही अडथळा ठरला नाही, उलट तो एक दैवी पुष्पवृष्टीच वाटत होती. जणू वीर सैनिकांच्या बलिदानाने स्वर्गातही चैतन्य पसरले होते आणि निसर्गही त्यांच्या शौर्याला मानवंदना देत होता.
पावसाच्या सरी अंगावर झेलत, मनामनात तिरंग्याचा अभिमान, डोळ्यांत देशप्रेम आणि ओठांवर ‘भारत माता की जय’च्या गजरासह ही रॅली निघाली. या रॅलीत सहभागी प्रत्येक नागरिकाने दाखवलेले राष्ट्राभिमानाचे दर्शन हे देशभक्तीचे जिवंत चित्र होते. या प्रसंगातून हे स्पष्ट झाले की, आजही देशभक्ती हा केवळ एक शब्द नाही, तर ती अंतःकरणातून उमटणारी एक शक्ती आहे. तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी एकवटलेल्या माणसांमध्ये एक अद्वितीय ऊर्जा आणि बांधिलकी होती, जी कोणत्याही हवामानाच्या आड येणार नाही. हा क्षण केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर स्फूर्तीदायक ठरला, नव्या पिढीला देशप्रेमाची नवी ज्योत देणारा होता.
‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी शहराचे रस्ते देशभक्तीच्या जल्लोषाने दुमदुमले. गडचिरोली शहरातील गांधी चौक येथून निघालेली ही रॅली मेन रोड, बाजार चौक, कारगिल चौक, तेली मोहल्ला, हनुमान वार्ड, सराफा लाईन, त्रिमूर्ती चौकातील हुतात्मा स्मारक आणि पुन्हा गांधी चौक येथे समारोपास पोहोचली. तिरंगा ध्वज मार्गक्रमण करताना देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते.
या रॅलीदरम्यान शहीद वीर जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कल्पना अशोक अमृतकर, संगीता विलास मांदाळे, नयना पुरुषोत्तम मेश्राम, मनीषा दुर्योधन नागतोडे आणि विजय रवी चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
रॅलीचा समारोप करताना भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते म्हणाले, “ही तिरंगा यात्रा केवळ एका भागीदारीचा भाग नाही, ती राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ उभी राहिलेली जनशक्ती आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहिम म्हणजे पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या हृदयात घुसून दिलेले थेट प्रत्युत्तर आहे. हिंदूंना लक्ष्य करत पहलगाम येथे केलेल्या पाशवी हल्ल्याचा बदला घेताना देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ दिले आणि शूर वीरांचा न्याय साकारला.” ही रॅली केवळ राजकीय नसून राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचा साक्षात गजर असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतमातेच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीर जवानांना त्यांनी शतशः नमन केले.
या प्रसंगी रॅलीत गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, शिवसेना नेते हेमंत जंबेवार, कि.मो.प्र.सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा डोळस, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, कामगार आघाडी प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जेष्ठ नेते गजाननराव येंनगदलवार, जेष्ठ नेते सुधाकर येनगदलवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, तालुकाध्यक्ष दतू सुत्रपवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, कि.मो.जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, तालुकाध्यक्षा रोशनी वरघंटे, दिलीप सारडा, विश्व हिंदू परिषद नेते रामायण खटी, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा महामंत्री कलीम शेख, डॉ. चंदा कोडवते, डॉ. नितीन कोडवते, अरुण हरडे, आनंद भांडेकर, मधुकर भांडेकर, मंगेश रणदिवे, गुड्डू सरदार, भास्कर बुरे, रेवनाथ कुसराम, केशव निंबोड, वर्षा शेडमाके, प्रतिभा चौधरी, गणेश दहेलकर, सोमेश्वर धकाते यांच्यासह विविध वयोगटांतील नागरिक मोठ्या संख्येने तिरंगा हातात घेऊन सहभागी झाले होते. त्यांनी देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याला वंदन केले.
ही रॅली एकजुटीचे, समरसतेचे आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक बनून संपन्न झाली. रॅलीची सांगता राष्ट्रगीताने झाली. गडचिरोली शहरात देशप्रेम जागृत करणारी आणि “ऑपरेशन सिंदूर” या देशभक्तीपर मोहिमेला वाहिलेली ही श्रद्धांजली पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.



