गडचिरोलीविदर्भ

‘सातवा आंबा महोत्सव २०२५’ उत्साहात संपन्न ; स्थानिक वाणांचे संशोधन व संवर्धनावर भर

जिल्हा ‘आंब्याचा जिल्हा’ म्हणून नावारूपास आणण्याचे खासदारांचे आवाहन

गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली, कृषि विभाग, गडचिरोली, एकात्मिक फलोत्पादन विकास महामंडळ, पुणे आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २६ मे रोजी “७ वा आंबा महोत्सव-२०२५” उत्साहात आयोजित करण्यात आला. हवामान बदलास अनुसरून गडचिरोली जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांची माहिती, स्थानिक वाणांचे जतन, आंबा पिकातील जैवविविधतेबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागृती, तसेच आंबा उत्पादनास विक्री प्रोत्साहन आणि शास्त्रोक्त लागवडीचे क्षेत्र वाढवून प्रक्रिया उद्योगाला चालना देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना सांगितले की, आंबा हे अधिक उत्पन्न देणारे फळपीक असून यापासून मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. गडचिरोली जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या स्थानिक गावरान आंब्यांवर संशोधन करून, त्या प्रजातींना मुख्य प्रवाहात आणून मोठ्या प्रमाणावर लागवड करावी आणि गडचिरोली जिल्ह्याला ‘आंब्याचा जिल्हा’ म्हणून नावारूपास आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आंबा लागवडीस भरपूर वाव असून, या पिकाखालील क्षेत्र वाढवण्यासाठी कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभाग यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच या स्थानिक प्रजातींना बाजारपेठ मिळवून देणेही आवश्यक असून, त्यासाठी जिल्हा प्रशासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

डॉ. देवानंद एम. पंचभाई, अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी गडचिरोली जिल्ह्याचे हवामान व जमीन आंबा लागवडीसाठी पोषक असल्याचे सांगितले. या भागात शास्त्रीय पद्धतीने आंबा लागवड मोठ्या प्रमाणात होऊ शकते. गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या स्थानिक गावरान आंब्यांच्या प्रजातींचे वर्गीकरण करून, त्यावर संशोधन करून लुप्त होत चाललेल्या या स्थानिक गावरान आंब्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. या आंबा महोत्सवात विद्यापीठातील संपूर्ण उद्यानविद्या विभाग पदव्युत्तर पदवी आणि आचार्य विद्यार्थ्यांसह सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

या महोत्सवामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक आंबा वाण, कलेक्टर व सि.ई.ओ. तसेच भंडारा जिल्ह्यातील आंब्याचे ‘काकडी लोकल’ वाण आकर्षणाचे केंद्र ठरले. प्रदर्शनीत एकूण २११ स्थानिक गावरान आंब्यांची नोंद करण्यात आली, ज्यात विविध आकार, वजन, रंग आणि सुवासाच्या आंब्यांच्या स्थानिक वाणांचा समावेश होता. मान्यवरांनी आंबा प्रदर्शनीला भेट देऊन आंब्याच्या विविध स्थानिक वाणांची पाहणी केली आणि माहिती जाणून घेतली.

या कार्यक्रमाला उपविभागीय कृषि अधिकारी, अहेरी आनंद गंजेवार, उपविभागीय कृषि अधिकारी, वडसा महेश परांजपे, उपविभागीय कृषि अधिकारी, गडचिरोली महेंद्र गिरीपुंजे, जिल्हा मृद तपासणी अधिकारी गणेश बादाडे, जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक; तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील उद्यानविद्या विभागाचे पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राच्या निलीमा पाटील, पी. ए. बोथीकर, डॉ. व्ही. एस. कदम, डॉ. पी. एन. चिरडे, एन.पी. बुध्देवार, डी.डी. चव्हाण, मोहीतकुमार गणविर, अंकुश ठाकरे, शशिकांत सलामे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्यालगत असलेल्या जवळपास १६० शेतकरी बंधू-भगिनींनी उपस्थिती दर्शविली.

या आंबा महोत्सवाचे सूत्रसंचालन एस. के. लाकडे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) यांनी केले, तर डॉ. वाय. आर. खोब्रागडे, सहयोगी प्राध्यापक ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button