आरोग्यगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

प्रशासनाच्या तत्परतेमुळे वाचला माता व बालकाचा जीव

एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील मातेला वेळेवर मिळाले उपचार ; ‘मिशन ९०-४२’ चे यश

गडचिरोली : जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील एका मातेला प्रसूतीची अंतिम तारीख उलटूनही रुग्णालयात येण्यास नकार देत असताना, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे वेळेवर उपचार मिळाले. यामुळे माता आणि बाळ दोघांचाही जीव वाचला असून, प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वीणा वासुदेव पोटवी (वय २२, रा. वाडसकला) यांची प्रसूतीची अपेक्षित तारीख २१ मे २०२५ असतानाही, त्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य पथक जरावांडी येथे येण्यास तयार नव्हत्या. मागील एक महिन्यापासून ‘९०-४२ दिवस मिशन’ अंतर्गत जरावांडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिल घोनमोडे आणि आशा सेविका मीना आतला त्यांच्या घरी जाऊन नियमित तपासणी करत होत्या. १५ मे २०२५ पासून आरोग्य सेविका सुनंदा आतला आणि आशाताई मीना आतला यांनी दररोज त्यांच्या घरी जाऊन आरोग्य सेवा दिली.

डॉ. घोनमोडे यांनीही अनेक वेळा मातेची तपासणी केली, परंतु माता आणि त्यांच्या कुटुंबीय रुग्णालयात येण्यास स्पष्ट नकार देत होते. मागील ५-६ दिवसांपासून मातेच्या पायावर आणि चेहऱ्यावर सूज वाढली होती, तसेच रक्तदाबही वाढत होता. यामुळे माता आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. ही गंभीर परिस्थिती माता आणि तिच्या नातेवाईकांना समजावून सांगितली असतानाही, त्यांनी रुग्णालयात येण्यास नकार दिला.

२६ मे २०२५ रोजी डॉ. प्रशिल घोनमोडे, ज्ञानेश्वर गिरहे (समुदाय आरोग्य अधिकारी, भापडा) आणि आरोग्य सेविका सुनंदा आतला यांनी पुन्हा एकदा ‘९०-४२ दिवस मिशन’ अंतर्गत घरी जाऊन तपासणी केली असता, मातेच्या चेहऱ्यावरील आणि पायांवरील सूज तसेच रक्तदाब लक्षणीय वाढलेला दिसला. यावरही माता आणि नातेवाईक दवाखान्यात येण्यास तयार नव्हते.

डॉ. घोनमोडे यांनी तातडीने ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांच्या निदर्शनास आणली. डॉ. चौधरी यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे आणि गट विकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांच्याशी संपर्क साधून जरावांडी पोलीस स्टेशनमधून मदत मिळवली.

जरावांडी पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती चव्हाण, श्रीमती इंगोले, एस. बी. तेलामी आणि सोपान उईके (महसूल सेवक) यांनी तातडीने मातेच्या घरी जाऊन तिची समजूत घातली. त्यांनी मातेला प्राथमिक आरोग्य पथक जरावांडी येथे आणले आणि कुटुंबीयांना आर्थिक मदतही केली.

प्राथमिक आरोग्य पथक जरावांडी येथे मातेची तपासणी करून प्राथमिक उपचार दिल्यानंतर, पुढील उपचारासाठी तिला जिल्हा स्त्री रुग्णालय, गडचिरोली येथे हलवण्यात आले. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग ‘१०० टक्के संस्थात्मक प्रसूती’ व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. गरोदर मातांना जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, मानव विकास कार्यक्रम अंतर्गत बुडीत मजुरी योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. या संपूर्ण घटनेवेळी प्राथमिक आरोग्य पथक जरावांडी येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button