महाराष्ट्रमुंबई

भारत-पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण

महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक – राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा

मुबई : पोर्तुगाल व भारताचे संबंध ऐतिहासिक आहेत. मात्र पोर्तुगालने आता भविष्यावर लक्ष केंद्रित केले असून भारताशी व्यापारासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवणार आहे. या संदर्भात पोर्तुगाल महाराष्ट्राशी देखील सहकार्य करार करण्याबाबत उत्सुक आहे, अशी माहिती पोर्तुगाल प्रजासत्ताकाचे भारतातील राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा यांनी येथे दिली.

राजदूत रिबेरो डी अल्मेडा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सोमवारी (दि. ९ जून) राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पोर्तुगालचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत कॅप्टन सोमेश बत्रा हे देखील बैठकीला उपस्थित होते.

यंदाचे वर्ष भारत – पोर्तुगाल देशांसाठी विशेष महत्वाचे असून उभय देशांमधील पुनर्स्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगून भारत व पोर्तुगाल देशांमध्ये व्यापार, पर्यटन, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याबद्दल प्रयत्न सुरु असल्याचे राजदूतांनी सांगितले. आपल्या मुंबई भेटीत आपण शंभराहून अधिक उद्योग प्रतिनिधींना भेटणार असल्याचे राजदूतांनी सांगितले.

पोर्तुगालमध्ये सव्वा लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील समाजाशी एकरूप झाले आहेत. भारतीय लोकांकडे विविध कौशल्ये असून आपल्या देशाला आज कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

स्कँडिनेव्हियन देशास पोर्तुगाल जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक सुरक्षित देश असल्याची माहिती देताना पर्यटनाच्या बाबतीत पोर्तुगाल आघाडीवर असल्याचे रिबेरो डी अल्मेडा यांनी राज्यपालांना सांगितले. या संदर्भात भारताशी पर्यटन सहकार्य वाढविले जाईल, असे त्यांनी सांगितले. पोर्तुगीज भाषा पोर्तुगाल शिवाय ब्राझील मोझाम्बिक, अंगोला, ईस्ट तिमोर, यांसह १५ देशांमध्ये बोलली जाते असे राजदूतांनी सांगितले.

स्पॅनिश व पोर्तुगीज या दोन भाषा जगातील अनेक देशांमध्ये बोलल्या जात असल्याची नोंद घेऊन, विद्यापीठांचे कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना एक तरी युरोपीय भाषा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपलब्ध करून द्यावी अशी सूचना केली असल्याची माहिती राज्यपालांनी यावेळी राजदूतांना दिली. विद्यार्थी भाषा शिकल्यास त्यांना विविध देशांमध्ये नोकरी व्यवसाय करणे सुलभ होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

पोर्तुगालने भारताशी व्यापार संबंध वाढविताना पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, वस्त्रोद्योग यापैकी ठराविक क्षेत्रे निवडावी व सध्याचा व्यापार १.२ अब्ज डॉलर वरून किमान १० अब्ज डॉलर वाढविण्याबाबत प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button