
सार्वजनिक स्मशानभूमीत सुरू होता जुगार; दहा आरोपी फरार
पोंभुर्णा : तालुक्यातील चेकफुटाणा येथील स्मशानभूमीच्या सार्वजनिक जागेत अवैध कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती मिळताच, मूल पोलिसांनी रविवारी (दि. ८ जून) दुपारी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली असून, दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून वाहनांसह एकूण ७ लाख २४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संजय रामदास सोनटक्के (वय ४५, रा. चेकफुटाणा), प्रवीण सोनटक्के (वय ३५, रा. देवाडा खुर्द), आणि भीमा पेंदोर (वय ३४, रा. कवडजई) यांचा समावेश आहे.
चेकफुटाणा येथे दिवसाढवळ्या कोंबड बाजार सुरू असून, त्यावर जुगार लावला जात असल्याची गोपनीय माहिती मूल पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. पोलिसांना पाहताच दहा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले, तर संजय सोनटक्के, प्रवीण सोनटक्के आणि भीमा पेंदोर या तीन आरोपींना पोलिसांनी जागीच पकडले.
पोलिसांनी घटनास्थळावरून वाहनांसह ७ लाख २४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फरार झालेल्या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता आणि कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अवैध जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मूल पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



