
२६ जूनपर्यंत सर्वेक्षण, २७ जूनपासून आधार नोंदणीचे फॉर्म भरणार ; मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक पुढाकार
गडचिरोली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA), नवी दिल्लीच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात दुर्लक्षित, बेघर, अनाथ किंवा रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना आधार नोंदणीद्वारे अधिकृत ओळख प्रदान करण्यासाठी ‘साथी मोहीम’ सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ मुलांची ओळख निर्माण करणे नसून, त्यांना शिक्षण, आरोग्य, निवारा, सामाजिक समावेश आणि कायदेशीर संरक्षण यांसारख्या आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीमार्फत राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेनुसार, २६ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी या मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर, २७ जून २०२५ ते ५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आधार कार्ड काढण्यासंबंधीचे फॉर्म भरून घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण मोहीम कार्यान्वित करण्यात आली आहे. या मोहिमेत विविध तालुक्यांचे तहसीलदार, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, सामाजिक संस्था, बाल कल्याण समित्या, विधिज्ञ आणि विधी स्वयंसेवक सक्रियपणे सहभागी होणार आहेत.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ए. पी. खानोरकर यांनी या ‘साथी मोहिमे’करिता जिल्ह्यातील जनसामान्य आणि सामाजिक संस्थांना सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी निराधार मुलांविषयीची कोणतीही माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली या कार्यालयास त्वरित कळवावी, असे सूचित केले आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील वंचित बालकांना योग्य आधार मिळून त्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग प्रशस्त होईल, अशी अपेक्षा आहे.



