गोंदियाविदर्भ

जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची गोर्हे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट; आदिवासी भागातील समस्यांची दखल

गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी मंगळवार, १७ जून रोजी सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील गोर्हे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून आदिवासी व नक्षलभागात जाणवणाऱ्या विविध समस्या जाणून घेतल्या.

यावेळी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल आत्राम, गोर्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवतप्रसाद बारई, भरारी पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुखदा पांडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणारे सर्व उपकेंद्रांतील कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका आणि फार्मासिस्ट तसेच आशा गट प्रवर्तक उपस्थित होते.

गोर्हे हे सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, जंगलव्याप्त आणि शेवटच्या टोकावरील आरोग्य संस्था आहे. अधिकाऱ्यांनी यावेळी मान्य केले की, गोर्हे कार्यक्षेत्रात आदिवासी भागातील गावांमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी कर्मचारी आणि गावकऱ्यांमध्ये उत्तम संवाद, समजून घेण्याची वृत्ती आणि सहकार्य असणे आवश्यक आहे.

जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी माता व बाल प्रजनन कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या अडचणींची माहिती जाणून घेतली. यामध्ये लहान बालक, किशोरवयीन मुले-मुली, गरोदर माता, स्तनदा माता आणि वयोवृद्ध यांना अतिजोखीम प्रसंगी आरोग्य सेवा देताना येणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा झाली. तसेच, आरोग्य सेवा देताना देण्यात येणारा पोषण आहार आणि कुपोषण या विषयावर अंगणवाडी सेविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

आदिवासीबहुल क्षेत्रात विविध साथीचे आजार, सिकलसेल, क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग याबाबत असलेली अंधश्रद्धा आणि विचारसरणी यावरही चर्चा करण्यात आली. जंगलव्याप्त भाग असल्याने पावसाळ्यात कुत्राचावा, सर्पदंश आणि विंचूदंश यांसारख्या समस्यांबाबतही माहिती घेण्यात आली.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी कीटकजन्य व जलजन्य आजारांबाबतची माहिती जाणून घेऊन, कार्यक्षेत्रात कीटकजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीमुळे आदिवासी भागातील आरोग्य सुविधांच्या सद्यस्थितीची सखोल माहिती मिळाली असून, त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button