
एटापल्ली : एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील शहरी शेतकऱ्यांसाठी कृषी विकास योजना लागू करावी, तसेच यासाठी जिल्हा खनिकर्म निधीतून विशेष आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार आणि राहुल कुळमेथे यांनी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नगरपंचायत क्षेत्रातील बहुतांश शेतकरी अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय घटकातील आहेत. त्यांच्याकडे शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री, भांडवल आणि तांत्रिक ज्ञानाचा अभाव आहे. यामुळे त्यांच्या पारंपरिक शेती पद्धतीतून फारसे उत्पादन मिळत नाही, परिणामी या कुटुंबांचे अर्थकारण सदैव संकटात असते.
या पार्श्वभूमीवर, नगरसेवकांनी मागणी केली आहे की, ग्रामीण भागात सुरू असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना शहरी शेतकऱ्यांनाही लागू व्हाव्यात. या सुविधा उपलब्ध झाल्यास शहरी भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासह ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन अंमलबजावणी करावी, असेही यात म्हटले आहे.
आधुनिक शेती आणि जोडधंद्यांसाठी सुविधांची मागणी
आधुनिक कृषी, फळतोडणी आणि वनशेतीसंबंधी प्रशिक्षण. एफपीओ (शेतकरी उत्पादक संस्था) आणि सहकारी संस्थांची स्थापना. अन्न प्रक्रिया उद्योग व साठवण केंद्रांची निर्मिती. शीतगृहे व औषधी वनस्पती प्रक्रिया युनिटची उभारणी. जलसिंचन व ठिबक सिंचनाची सुविधा. विहिरी व सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी. पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन व मधमाशीपालन यांना प्रोत्साहन. आदी सुविधा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.



