
चालकासह काही प्रवासी किरकोळ जखमी ; पोलीस घटनास्थळी दाखल
गोंदिया : गोंदियाहून नागपूरकडे जाणाऱ्या शिवशाही बसचा १ जुलै रोजी दुपारी ११:४५ वाजता गोंदिया-कोहमारा राज्य महामार्गावर अपघात झाला. डव्वा आणि खजरी गावादरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने स्टेअरिंग वळवले, ज्यामुळे शिवशाही बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या चुकीच्या बाजूने शेतात घुसली.
अपघाताच्या वेळी शिवशाही बस क्रमांक एमएच 06/बीडब्ल्यू 1170 मध्ये २५ ते ३० प्रवासी होते. यापैकी बस चालकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या मोठ्या संख्येने लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. माहिती मिळताच, पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची खात्री केली.
या घटनेनंतर, क्रेनच्या मदतीने शिवशाही बसला शेतातील चिखलातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणाजवळ आणखी एका शिवशाही बसचा अपघात झाला होता, ज्यामुळे या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



