चंद्रपूरविदर्भ

शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात आ. सुधीर मुनगंटीवारांची पोलिसांत धाव; कोरोमंडल कंपनीविरोधात तक्रार दाखल

बल्लारपूर: शेतकऱ्यांना रासायनिक खत देताना इतर उत्पादने जबरदस्तीने खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीविरोधात शनिवार, ५ जुलै रोजी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी यांनी खताचे वाटप आणि वितरण कसे करावे, याबाबत कोरोमंडल कंपनीला स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही, कंपनी शेतकऱ्यांना अनावश्यक उत्पादने घेण्यास जबरदस्ती करत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोमंडल कंपनीला दोन नोटिसा बजावून ‘लिंकिंग’चा हट्ट सोडून देण्याचे सुचवले होते. तरीही, ही कंपनी शेतकऱ्यांना डीएपी (DAP) खताच्या खरेदीसोबत सल्फर, पीडीएम पोटॅश आणि १५:१५:१५ खते जबरदस्तीने घ्यायला लावत असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आ. मुनगंटीवार यांनी या संदर्भात कृषी विभागाचे सचिव विकास रस्तोगी यांची वैयक्तिक भेट घेतली आणि चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारचे शेतकऱ्यांविरोधातील अन्यायकारक प्रकार होऊ नयेत, याबाबत त्यांचे लक्ष वेधले. “जगाच्या पोशिंद्यांवर असा अन्याय होतो आहे,” हे त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, त्यांनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे विक्री व विपणन उपप्रबंधक प्रितम सिंह यांच्याशीही संवाद साधून शेतकऱ्यांवर जबरदस्ती न करण्याचे आणि झालेल्या चुका तात्काळ दुरुस्त करण्याचे आवाहन केले.

कोरोमंडल लिमिटेड आणि कंपनीचे विक्री व विपणन उपप्रबंधक प्रितम सिंह यांच्या विरुद्ध तक्रार देताना भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक अधिनियमांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. “शेतकऱ्यांचे शोषण थांबले नाही, तर यापुढे आंदोलनात्मक मार्गही अवलंबण्यात येईल,” असा इशाराही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांना रासायनिक खत पुरवठा करताना जबरदस्तीने इतर वस्तू विकत घेण्यास भाग पाडणाऱ्या खत पुरवठाधारकांविरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय आ. मुनगंटीवार यांनी घेतला असून, त्याचाच भाग म्हणून आज ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेतीसाठी अत्यावश्यक असलेले रासायनिक खत कोरोमंडलसारख्या नामांकित कंपन्यांकडून वितरित केले जाते. मात्र, या खतांच्या वितरणासोबत अन्य वस्तूंची “लिंकिंग” करून छोट्या विक्रेत्यांवर जबरदस्ती केली जात आहे, ज्यामुळे थेट शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि त्यांच्या आर्थिक शोषणाची स्थिती निर्माण होते. याच मुद्द्याकडे आ. मुनगंटीवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button