गडचिरोलीविदर्भ

मुडेवाही गाव दारूमुक्त; मुक्तिपथच्या प्रयत्नांना यश, ग्रामस्थांनी घेतला पुढाकार

गडचिरोली: जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील रेगुलवाही ग्रामपंचायत अंतर्गत असलेले मुडेवाही हे दुर्गम आदिवासी गाव आता दारूमुक्त झाले आहे. गावाच्या सभोवताल डोंगर आणि घनदाट जंगल असून, अहेरीवरून व्यंकटापूर मार्गे सिरोंचा तालुक्यातील परसेवाडा पहाडीवरून या गावात जावे लागते. गावात बससेवा नसल्याने दळणवळणाची अडचण आहे. या गावात प्रामुख्याने माडिया आदिवासी समाजाचे लोक वास्तव्य करतात आणि शेती करून आपला उदरनिर्वाह करतात.

पूर्वी या गावात घरगुती मोहफुलाची दारू गाळून पिण्याचे प्रमाण मोठे होते. हंगामात ताडी काढून लहान-मोठे, तसेच महिलाही त्याचे प्राशन करत असत. त्यामुळे गावात व्यसनाचे प्रमाण स्पष्टपणे दिसून येत होते. अशा परिस्थितीत मुक्तिपथ संस्थेने या गावात दोनदा सघन भेट उपक्रमाचे आयोजन करून ग्रामस्थांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले आणि त्यांना जागृत केले.

मुक्तिपथ टीमने पहिली सघन भेट १५ जानेवारी रोजी गावात दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करून दारूचे दुष्परिणाम पटवून दिले. व्यसनातून मुक्त होण्यासाठी व्यसन उपचाराची माहितीही देण्यात आली. काही दिवसांनंतर ग्रामस्थांनी व्यसन उपचार शिबीर घेण्याची विनंती केली. या मागणीनुसार मुक्तिपथ टीमने १८ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या सघन बैठकीचे आयोजन करून व्यसन उपचार शिबीर घेतले. या शिबिरात एकूण २२ जणांनी उपचार घेतला.

उपचार शिबिरानंतर गावातील दारूबंदीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील लोकांनी पुढाकार घेत गावाला दारूमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शक्तिपथ संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून गावात सुरू असलेली घरगुती दारू पूर्णपणे बंद करण्यात आली. मुडेवाही गावाला दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथचे नंदिनी आशा, नितीन पोटे, आणि महेंद्र उसेंडी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button