गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोलीत काँग्रेसचे ‘थाली बजाओ – ताली बजाओ’ आंदोलन ; वाढत्या मलेरिया रुग्णांवरून सरकारवर निशाणा

गडचिरोली : जिल्ह्यातील वाढत्या मलेरिया रुग्णांची संख्या आणि आरोग्य विभागाच्या कथित निष्क्रिय कारभाराविरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवार, ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद, गडचिरोली येथे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनासमोर ‘थाली बजाओ – ताली बजाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी ‘गो मलेरिया गो – पालकमंत्री दो… गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याचा प्रशासनाने केला खो’, असा नारा देत सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘थाली बजाओ – ताली बजाओ, दिए जलाओ’ असे आवाहन केले होते आणि त्यामुळे कोरोना जाईल असा दावा केला होता. त्याच धर्तीवर, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांनीही असाच काही आदेश काढून गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या मलेरियावर उपाययोजना करावी, असे आवाहन ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या प्रशासन आणि शासनाच्या निष्क्रियतेमुळे मलेरिया रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक मलेरियाचे रुग्ण आढळले असून, मागील चार दिवसांत अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे १० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. तरीही शासन यावर उपाययोजना करण्यास अकार्यक्षम असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांत आरोग्य सेविका व कर्मचारी उपलब्ध नाहीत. अजूनही अनेक गावांमध्ये औषधी साठा आणि गोळ्यांचा पुरवठा झालेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा निष्क्रिय कारभार समोर येतो आणि अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागतो. शासन आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसने करत, यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

त्याच पद्धतीने जिल्ह्यातील अनेक उपजिल्हा रुग्णालयांमध्ये बऱ्याच सुविधांचा अभाव आहे. कोरोना काळात अनेक उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plant) लावण्याकरिता निविदा काढण्यात आल्या होत्या, मात्र काम पूर्ण न झाल्याने अनेक प्लांट धूळ खात पडले आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. सर्व उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावेत, तसेच रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी, या सर्व मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button