
वडेगाव-बिरसी मार्गावरील घटना
तिरोडा : तालुक्यातील वडेगाव येथे सोमवारी (७ जुलै) सकाळी सहा वाजता वडेगाव-बिरसी मार्गावरील सातोना हाऊसजवळील पॉवर टर्निंग पॉइंटजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. मुलाला दुचाकीवरून शाळेत सोडायला जात असताना झाडावर वीज कोसळली आणि ते झाड थेट त्यांच्या दुचाकीवर पडल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. जीवचंद यादोरावर बिसेन (४६, रा. वडेगाव) असे ठार झालेल्या वडिलांचे, तर चिराग बिसेन (१६, रा. वडेगाव) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीवचंद बिसेन हे सोमवारी सकाळी आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३५-एपी ९३७०) मुलगा चिरागला बिरसी येथे शाळेत सोडण्यासाठी घेऊन जात होते. वडेगाव-बिरसी मार्गावरील सातोना जवळील पॉवर हाऊसजवळील टर्निंग पॉइंटजवळ ते पोहोचले असता, अचानक एका झाडावर वीज कोसळली. वीज कोसळल्याने ते झाड जीवचंद बिसेन यांच्या धावत्या दुचाकीवर पडले. या भीषण अपघातात जीवचंद बिसेन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दुचाकीवर मागे बसलेला त्यांचा मुलगा चिराग बिसेन याला उजव्या हाताला, पायाला, कमरेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ तिरोडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चिरागला पुढील उपचारांसाठी गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जिल्ह्यात रविवार (६ जुलै) रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. तिरोडा तालुक्यात तर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. जीवचंद बिसेन हे वडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



