
गोंदिया : गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकातील बस स्टॉपसमोरील ‘मॉस मेकअप स्टुडिओ अँड द बॉडीज स्पा सेंटर’ येथे मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून खात्री पटल्यानंतर, पोलिसांनी धाड टाकून या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी स्पा सेंटरच्या दोन मालकांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, तसेच ‘बेटा बचाव राष्ट्रीय अभियान’ आणि ‘नशा हटाव, बेटा बचाव’ या संस्थांच्या गोंदिया जिल्हाध्यक्षांच्या सहकार्याने सापळा रचण्यात आला.
जयस्तंभ चौकातील ‘मॉस मेकअप स्टुडिओ अँड द बॉडीज स्पा सेंटर’च्या आजूबाजूला सापळा रचून धाड टाकण्यात आली. धाडीदरम्यान, एका खोलीत ग्राहक आणि एक महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. चौकशी केली असता, त्या महिलेने सांगितले की, स्पा सेंटरचे मालक बळीराम बस्ताराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप बस्ताराम घोटेकर हे तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते.
सेंटरची अधिक पाहणी केली असता, पहिल्या मजल्यावर आणखी चार महिला आढळून आल्या. त्यांनीही बळीराम आणि दिलीप घोटेकर हेच त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे पोलिसांना सांगितले.
‘मॉस मेकअप स्टुडिओ अँड द बॉडीज स्पा सेंटर’चे मालक बळीराम बस्ताराम घोटेकर (वय ३५, रा. रेलटोली, कस्तुर हॉटेलजवळ, गोंदिया) आणि त्याचा भाऊ दिलीप बस्ताराम घोटेकर (वय ३२, रा. रेलटोली, कस्तुर हॉटेलजवळ, गोंदिया) हे १० जुलै रोजी या सेंटरमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५४६/२०२५, कलम ३, ४, ५, ६ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गेडाम (पो.स्टे. गोंदिया शहर) करत आहेत.
पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धिरज राजुरकर, पोउपनि वनिता सायकर, पोहवा राजेंद्र मिश्रा, पोहवा संजय चव्हाण, पोहवा महेश मेहर, पोहवा रियाज शेख, पोहवा प्रकाश गायधने, पोहवा सोमेन्द्रसिंग तुरकर, पो.शि. संतोष केदार, पो.शि. राकेश इंदुरकर, पो.शि. छगन विठ्ठले, मपोशि स्मिता तोंडरे, चापोशि राम खंडारे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा) यांनी ही कारवाई केली.



