
दोन पुलांचे बांधकाम व रुग्णवाहिकेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
गडचिरोली: जिल्ह्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या धानोरा तालुक्याच्या विकासासाठी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी धानोरा तालुक्यातील महत्त्वाच्या पुलांचे बांधकाम आणि तातडीच्या आरोग्य सेवेकरिता रुग्णवाहिकेची निधी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली.
धानोरा तालुक्यात मूलभूत पायाभूत सुविधा अत्यंत अपुऱ्या असल्याने नागरिकांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी डॉ. नेते यांनी गडकरींकडे प्रमुख मागण्या केल्या. धानोरा – चिचोली कठाणी नदीवरील पुलाचे बांधकाम यासाठी अंदाजे ₹४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दूधमाडा – मिजगाव खुर्द दरम्यान कठाणी नदीवरील पुलाचे बांधकाम यासाठीही अंदाजे ₹४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात, त्यामुळे धानोरा शहरासाठी तातडीची ‘ॲम्बुलन्स सेवा’ उपलब्ध करून देणे.
या सर्व मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी Central Road Fund (CRF) अंतर्गत निधी मंजुरीसाठी आवश्यक असलेला डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. यामुळे पुलांच्या कामाला गती मिळणार असून, आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होणार आहे.
डॉ. नेते यांनी या प्रयत्नांमुळे धानोरासारख्या भागात विकासाला गती मिळेल आणि जनतेच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडेल अशी आशा व्यक्त केली. स्थानिकांनी सातत्याने केलेल्या या मागणीला आता योग्य दिशा मिळेल आणि धानोरा तालुका विकासाच्या मार्गावर प्रगतीपथावर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निवेदन देताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, सामाजिक नेते धनंजय पडीशाल्लवार, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडीचे आयटी सेल प्रमुख अक्षय उईके, युवा नेते सारंग साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



