
इमारत बांधकाम, रिक्त पदे, वसतिगृहाची परवानगी यांसह अनेक मुद्द्यांवर वेधले लक्ष
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासह, रिक्त पदे आणि इतर प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी २७ जुलै रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांसाठी हे प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी डॉ. होळी यांनी केली.
डॉ. देवराव होळी यांनी आमदार असताना गडचिरोली जिल्ह्यात सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय मंजूर व्हावे, अशी अनेकदा विधानसभेत मागणी केली होती आणि सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही त्यांनी मेडिकल कॉलेजसाठी एक महिना ‘घेराव चक्का जाम’ आंदोलन केले होते. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यासाठी ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ मंजूर झाले होते. आरोग्य क्षेत्रातील १७ वर्षांच्या अनुभवामुळे आपल्याला मेडिकल कॉलेजचीच आवश्यकता वाटत होती, असे डॉ. होळी यांनी सांगितले. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर, त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि आग्रही मागणीमुळे गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली, असे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी सांगितल्याचे डॉ. होळी यांनी नमूद केले.
डॉ. होळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवश्यक बाबींची पूर्तता तातडीने करण्यासंदर्भात अनेक प्रलंबित प्रश्न मांडले. शासकीय महाविद्यालयासाठीची १५ हेक्टर आर इतकी जागा पंजाबराव देशमुख कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्राला परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला त्वरित स्थगिती द्यावी, कारण वनविभागाकडून नवीन जागा मिळण्यास जास्त कालावधी लागू शकतो. शासकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ४७१.४१ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता तात्काळ देण्यात यावी. एमबीबीएसचा प्रथम वर्ग सुरू आहे आणि यावर्षी द्वितीय वर्गाला सुरुवात होणार आहे. यासाठी विविध विभाग स्थापित करण्यासाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा. वर्ग एक व दोनची अध्यापकाची, कनिष्ठ निवासी व ट्यूटरची पदे, तसेच वर्ग तीन व चारची रिक्त पदे जी शासनस्तरावर प्रलंबित आहेत, ती तातडीने भरण्यात यावीत. एमबीबीएसच्या प्रथम व यावर्षी होणाऱ्या द्वितीय वर्गाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची उच्च तंत्र शिक्षण सहसंचालक यांच्याकडील परवानगी त्वरित आदेशित करण्यात यावी.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील प्रश्नांविषयी असलेली तळमळ लक्षात घेऊन हे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन डॉ. देवराव होळी यांना दिले.
डॉ. देवराव होळी यांनी खंत व्यक्त केली की, आमदार असताना ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासंबंधीच्या अडचणींवर बारीक लक्ष ठेवून त्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवत होते, जेणेकरून सुसज्ज मेडिकल कॉलेज निर्माण झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळतील. मात्र सध्या याबाबतीत प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने लक्ष दिले जात नाही, असे त्यांना वाटते.



