
वन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप; जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवरही कारवाईची मागणी
गडचिरोली : गडचिरोली येथे अवैध मुरूम उत्खनन आणि वन्यजीव संरक्षण नियमांच्या उल्लंघनासंदर्भात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला चाळीस दिवस पूर्ण झाले. या चाळीसाव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करत, सुस्त अवस्थेत असलेल्या वन विभागाला जागे करण्याचा आणि त्यांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
आंदोलनकर्त्यांनी केलेल्या तक्रारींनुसार, वडसा वन विभागातील आरमोरी वनपरिक्षेत्रातून रात्रीच्या वेळी मुरूम उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या एका कंपनीवर बोगस जप्तीची कारवाई दाखवून वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षकांनी आर्थिक हेतूपोटी चुकीचे कारण दिले. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आंदोलक करत आहेत. याशिवाय, पोर्ला वन परिक्षेत्रातून रात्रीच्या वेळेत वन परिसरातून वाहतूक करणे, टीसीएम (Tree Cutting Mark) बुजवून, तार कंपाऊंड तोडून वनसंपत्तीला हानी पोहोचवण्याच्या कारणावरून वनगुन्हा नोंद करणे अपेक्षित असताना, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर आणि क्षेत्र सहाय्यक अरुण गेडाम यांनी आर्थिक हेतूपोटी कंपनीला सहकार्य केल्याचा आरोप आहे. त्यांना तात्काळ निलंबित करून जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर वनगुन्हा नोंद करून त्यांनी वापरलेली वाहने तात्काळ जप्त करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.
या संपूर्ण तक्रारींवर कारवाई करून संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी श्रीकृष्ण वाघाडे, शंकर ढोलगे, रवींद्र सेलोटे, विलास भानारकर, प्रवीण ठाकरे हे मागील चाळीस दिवसांपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर शांतपणे ठिय्या आंदोलन करत आहेत.
चाळीस दिवसांपर्यंत शांत पद्धतीने केलेल्या आंदोलनाकडे वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक बी. वरुण यांनी पूर्णपणे कानाडोळा केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने विचारणा करूनही त्यांना कुठलेही समाधानकारक उत्तर देता न आल्याने, त्यांची परिसरात ‘असमर्थ अधिकारी’ अशी ओळख निर्माण झाल्याचे आंदोलक सांगतात. या प्रकरणात त्यांना वारंवार पुरावे सादर करूनही त्यांनी चुकीचा आणि कंपनीच्या बाजूने अहवाल देऊन तक्रारकर्त्यांची दिशाभूल केल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
याच कारणामुळे आंदोलनकर्त्यांना ‘ढोल बजाओ’ आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. या आंदोलनानंतर तरी उपवनसंरक्षक वडसा यांना जाग येईल, अशी आशा धरून आंदोलनकर्त्यांनी ढोल वाजवून आपला निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे वन विभागावरील दबाव वाढला असून, आता या प्रकरणात कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



