गडचिरोलीविदर्भ

प्रमोद पिपरे यांचा नागपूर विभागीय सहकारी संघ निवडणुकीत विजय

पहिल्याच प्रयत्नात जिल्हा सहकार बोर्ड प्रतिनिधीपदी निवड; गडचिरोलीला सहकार क्षेत्रात नवीन नेतृत्वाची संधी

गडचिरोली : राज्याच्या सहकार क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सहकारी संघाच्या नागपूर विभागीय मतदार संघातून जिल्हा सहकार बोर्ड प्रतिनिधींच्या निवडणुकीत गडचिरोलीचे माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. मतदारांशी असलेला दांडगा जनसंपर्क आणि पक्षातील ज्येष्ठ नेतृत्वाच्या बळावर त्यांनी ही चुरशीची निवडणूक यशस्वी केली.

प्रमोद पिपरे हे जिल्हा सहकार बोर्डाच्या नागपूर विभागात प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात विजयश्री खेचून आणली. त्यांच्या या विजयाने गडचिरोली जिल्ह्याला सहकार क्षेत्रात एक नवीन आणि सक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. पिपरे यांचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास सहकार क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

प्रमोद पिपरे यांच्या विजयासाठी भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात अनेक कार्यकर्त्यांनी आणि सहकार क्षेत्रातील व्यक्तींनी परिश्रम घेतले. यामध्ये सहकार चळवळीत सक्रिय असलेले इंजि. प्रा. सुभाष आकरे, भाजपचे गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते यशवंत मानकर, आणि खुमेंद्र कटरे यांचा विशेष सहभाग होता.

या निवडणुकीत पिपरे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणारे माजी खासदार अशोक नेते, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, माजी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, जिल्हा महामंत्री योगिता पिंपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, आणि जिल्हा सहकारी बोर्डचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम यांनी पिपरे यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button