
चोरट्यांकडून पोलिसांना चकमा देण्याचा नवा ‘फंडा‘; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
तुमसर : तुमसर शहर आणि तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पोलिसांच्या तपासाला चकमा देण्यासाठी आता चोरीचा एक नवा ‘फंडा’ समोर आला आहे. शहरातील नवीन बसस्थानकासमोरील ‘परफेक्ट मोबाईल’ दुकानात धाडसी चोरी करताना चोरट्यांनी तब्बल १५ लाख रुपयांचे मोबाईल लंपास केले, पण त्याआधी त्यांनी दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरच चोरून नेले. यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
‘परफेक्ट मोबाईल’ दुकानात चोरी करताना चोरट्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही यंत्रणाच फोडली. त्यांनी दुकानातील डीव्हीआर आणि कॅमेरे पळवून नेले, जेणेकरून त्यांची ओळख पटू नये. यानंतर त्यांनी दुकानातील १५ लाख रुपयांचे नवीन आणि जुने मोबाईल फोन लंपास केले. याच प्रकारे सिहोरा येथील एका ज्वेलर्सच्या दुकानाचे शटरही तोडण्यात आले आहे.
तुमसर शहरात सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही टोळी सहज शटर तोडून दुकानात प्रवेश करत असल्याने, ते यासाठी विशिष्ट यंत्राचा वापर करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मुख्य रस्त्यावरील दुकाने सहज फोडली जात असल्याने, ही आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. स्थानिक व्यक्तींचाही यात सहभाग आहे का, याचा तपास करण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.
तुमसर आणि सिहोरा परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.



