
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने बटाणा, चारगाव आणि बनाथर येथील लाभार्थ्यांना मिळाला हक्क
गोंदिया : उपविभाग गोंदिया अंतर्गत सुरू असलेल्या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने १४ लाभार्थ्यांना शासकीय भूखंड आणि वनपट्टे वाटप करण्यात आले. महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरिकांना त्यांच्या जमिनीचा हक्क मिळाला आहे.
४ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमात मौजा बटाणा आणि चारगाव येथील ११ लाभार्थ्यांना भूखंड पट्टे वाटप करण्यात आले. तसेच, मौजा बनाथर येथील तीन वनपट्टेधारकांना वनपट्टे आणि ७/१२ चे उतारे वितरित करण्यात आले.
हा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत आणि परिविक्षाधीन आयएएस अधिकारी साई किरण नंदाला यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी तहसीलदार शमशेर पठाण, नायब तहसीलदार आणि इतर कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पट्टे वाटपामुळे संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या जमिनीवर कायदेशीर हक्क मिळाला असून, यामुळे त्यांच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत.



