
गोंडवाना विद्यापीठात बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन
गडचिरोली : इतिहासाच्या पानांमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान समाजासमोर आणणे आवश्यक आहे. इंग्रजांच्या काळात लिहिला गेलेला इतिहास बदलून, वीर बाबुराव शेडमाके आणि बिरसा मुंडा यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचे योगदान पुस्तक रूपाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठात बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘भारतीय इतिहास लेखन: मध्य प्रांतातील जनजातीय योगदान’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या परिसंवादाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन सभागृहात करण्यात आले. यावेळी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी, नवी दिल्लीचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी आणि कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांची विशेष उपस्थिती होती. याव्यतिरिक्त, जनजातीय कार्यकर्ते व प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, पद्मश्री जागेश्वर यादव, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे युवा प्रमुख वैभव सुरंगे, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या परिसंवादाचा मुख्य उद्देश भारताच्या इतिहासात मध्य प्रांतातील आदिवासी समाजाच्या योगदानावर प्रकाश टाकणे हा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विवेक जोशी यांनी, संचालन सहा. प्राध्यापक हेमराज निखाडे यांनी केले. आभार सहा. प्राध्यापक वैभव मसराम यांनी मानले. हा कार्यक्रम गोंडवाना विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग आणि आदिवासी अध्यासन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.



