गोंदियाविदर्भ

‘ओम योगा सेंटर’मध्ये अवयवदान जनजागृती; नागरिकांनी घेतली अवयवदानाची शपथ

गोंदिया : महाराष्ट्रात अवयवदानाचे प्रमाण वाढावे आणि गरजूंना नवजीवन मिळावे या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘अंगदान जीवन संजीवनी’ अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे. या अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असून, गोंदिया शहरातील “ओम योगा सेंटर” येथे एक विशेष अवयवदान जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

गोंदिया जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘अंगदान जीवन संजीवनी’ अभियानाची व्यापक प्रसिद्धी केली जात आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या एकत्रित सहकार्याने विविध आरोग्य संस्था, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि अशासकीय संस्थांमध्ये आरोग्य विभागाचे पथक अवयवदानाची शपथ व जनजागृती करत आहे.

कार्यक्रमात केटीएस रुग्णालयाच्या नेत्रदान सल्लागार भाविका बघेले यांनी मार्गदर्शन केले. योगा सेंटरचे सदस्य तसेच इतर नागरिकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेत अवयवदानाच्या प्रतिज्ञा घेतल्या.

या कार्यक्रमात भाविका बघेले यांनी अवयवदानाचे महत्त्व, कोणते अवयव दान करता येतात, नेमकी कोणती प्रक्रिया असते, कायदेशीर बाबी आणि मेंदूमृत (Brain Death) व्यक्तीचे महत्त्व या सर्व गोष्टींवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “अंगदानाची खरी गरज समाजाने समजून घेतली पाहिजे. लोकांना योग्य माहिती मिळाल्यास अनेकांचे जीवन वाचू शकते.” अनेक उपस्थितांनी यावेळी ऑनलाइन अवयवदानासाठी संमती अर्ज भरून नोंदणी केली.

कार्यक्रमात अवयवदानामुळे अनेक जणांना नवे जीवन मिळू शकते, हे विविध उदाहरणांद्वारे सांगण्यात आले. नेत्रदानाच्या गरजेवर विशेष भर देत, एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, हे विशद करण्यात आले. अवयवदानाची ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी प्रक्रिया कशी करावी, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन देण्यात आले. राष्ट्रीय अंगदान संस्था (NOTTO) च्या अधिकृत वेबसाइटचा वापर कसा करायचा, कोणते तपशील भरायचे आणि नोंदणीनंतर कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, हे सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रभावी आयोजनासाठी ओम योगा सेंटरच्या दिपाली कठाने यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम जिल्हा समुपदेशक भाविका बघेले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे आणि भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button