
अंकिसा येथील घटना; आई-वडील जखमी
गडचिरोली : रक्षाबंधनानिमित्त सिरोंचा येथे जात असताना झालेल्या एका भीषण अपघातात आठ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (दि.९) सकाळी सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे ही हृदयद्रावक घटना घडली.
असरअली येथील संतोष रामलू कोकू (वय ४३) हे आपली पत्नी सौंदर्या कोकू (वय ३६) आणि मुलगा शौर्य कोकू (वय ८) यांच्यासह दुचाकीवरून सिरोंचाकडे जात होते. अंकिसा गावात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. रस्ता अरुंद असल्यामुळे संतोष कोकू यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या शौर्यचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात संतोष कोकू यांचा डावा हात आणि पाय मोडला असून, त्यांची पत्नी सौंदर्या कोकू किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तेलंगणातील वारंगळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रक्षाबंधनासारख्या सणादिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे असरअली आणि सिरोंचा परिसरात शोककळा पसरली आहे.



