क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

‘त्या’ ४ मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला ट्रक चालक ताब्यात

४८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गडचिरोली पोलिसांना यश ; सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे छत्तीसगडमधून आरोपीला पकडले

गडचिरोली : गडचिरोली शहराला हादरवून सोडणाऱ्या काटली येथील अपघाताचा छडा लावण्यात गडचिरोली पोलिसांना अखेर यश आले आहे. पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या सहा मुलांना चिरडणाऱ्या ट्रकचा चालक आणि सहचालकाला पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छत्तीसगडमधून ताब्यात घेतले आहे. या अपघातात चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

७ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४ वाजता काटली येथील सहा मुले व्यायामासाठी आरमोरी-गडचिरोली महामार्गावर गेले होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने त्यांना चिरडले. यात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी झालेल्या १३ आणि १४ वर्षांच्या दोन मुलांवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी पोस्टे गडचिरोली येथे अप. क्र. ०६३७/२०२५ सदोष मनुष्यवध (कलम १०५ भान्यासं) यासह कलम २८१, १२५ (ए), १२५ (बी) भान्यासं आणि कलम १३४, १८७, १८४ मोटार वाहन अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला होता.

गुन्ह्याच्या तपासासाठी पाच पथके तयार करण्यात आली. हा गुन्हा आव्हानात्मक होता, कारण आरोपी ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांचा अत्यंत बारकाईने तपास केला. न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या मदतीने पोलिसांनी आरोपींच्या ट्रकची ओळख पटवून त्याचा माग काढला. अखेर, छत्तीसगडमधून पोलिसांनी ट्रक चालक प्रविण बाळकृष्ण कोल्हे (वय २६, रा. चिचगड, जि. गोंदिया) आणि सहचालक सुनिल श्रीराम मारगाये (वय ४७, रा. चिचगड, जि. गोंदिया) यांना ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे गडचिरोली पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. विनोद चव्हाण, स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे व अंमलदार यांनी पार पाडली. आरोपींना लवकरच न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button