
गोंडवाना समाज सुधारक मंडळातर्फे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
गडचिरोली : आदिवासी समाजाने कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य व स्व-जागृती ही पंचसूत्री स्वीकारल्यास सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास साध्य होईल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
गोंडवाना समाज सुधारक मंडळ, फुटाना/चिचगड यांच्या सौजन्याने आयोजित जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार डॉ. देवराव होळी तसेच माजी सभापती सविता पुराम यांच्या उपस्थितीत चिचगड येथील ४५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
डॉ. होळी म्हणाले की, “आदिवासी समाज बांधवांनी ही पंचसूत्री आपल्या जीवनशैलीत, चालीरीतींमध्ये आणि रुढी-परंपरांमध्ये अंगीकारणे म्हणजेच पंचपरिवर्तन होय. समाजात ही पंचसूत्री प्रभावीपणे राबविल्यास सामाजिक आणि मानसिक बदल घडवून आणणे शक्य आहे.” समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, आत्मनिर्भर समाज निर्माण करण्यासाठी आणि देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी हे कार्य करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली, शाखा गडचिरोलीच्या माध्यमातून ही पंचपरिवर्तनाची सूत्रे समाजात रुजवण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. या सूत्रांचा स्वीकार करून समाज जेव्हा त्यानुसार जगू लागेल, तेव्हाच आदिवासी समाजाचा शाश्वत विकास शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
९ ऑगस्ट या आदिवासी दिवस व क्रांती दिनाचे औचित्य साधून त्यांनी समाजातील तत्त्वज्ञ, लेखक, विचारवंत, इतिहासकार, विद्वान आणि जागृत समाज घटकांना या पंचपरिवर्तनाच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. ही माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून ती रुजविण्याचे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, सभापती अनिल बिसेन, नगराध्यक्ष संजू उईके, माजी उपसभापती मारोतराव इचोडकर, राजकुमार पुराम, रमेश ताराम, अंबिका बंजार, टिकेश बोपचे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



