
गडचिरोली : दारूचे व्यसन जडलेल्यांना यातून बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांकरिता मुक्तिपथने व्यसन उपचार क्लिनिकच्या माध्यमातून मोफत संधी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत अनेकांनी दारूचे व्यसन सोडून सुखी संसाराला सुरवात केली आहे. नुकतेच विविध तालुका मुख्यालयात आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ४८ रुग्णांनी उपचार घेतला.
व्यसन ही एक गंभीर समस्या आहे. अनेकांची दारू पिण्याची सुरवात मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांच्या दबावाखाली किंवा एखाद्या समारंभात होते. काही जण कामाचा किंवा वैयक्तिक जीवनातील ताण कमी करण्यासाठी दारूचा आधार घेतात. तसेच नैराश्य किंवा चिंता कमी करण्यासाठी दारू पिणे सुरवात करतात. दारू पिणे म्हणजे ‘स्टाईल’ किंवा ‘आत्मविश्वास’ आहे, असा गैरसमज आताच्या नवीन पिढीत निर्माण झालेला आहे. सुरुवातीला लोकांना दारू पिणे मजेदार किंवा आरामदायक वाटू शकते, पण हळू हळू त्यांचे शरीर आणि मन त्यावर अवलंबून राहू लागते. यामुळे दारूच्या व्यसनाला सुरवात होते. हे एक मानसिक आजार आहे. या व्यसनामुळे यकृताचे रोग, हृदयविकार, कर्करोग, आणि इतर अनेक शारीरिक समस्यांसह. नैराश्य, चिंता, स्मरणशक्ती कमी होणे आणि कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात संबंध बिघडणे, आर्थिक अडचणी अशा अनेक समस्या निर्माण होतात. व्यसनातून मुक्त होण्यासाठी उपचार घेतल्यास हा मानसिक आजार ठीक होऊ शकते, याकरिता मुक्तीपथतर्फे प्रत्येक तालुका मुख्यालयी नियोजित दिवशी व्यसन उपचार शिबिराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नुकतेच कुरखेडा ६, अहेरी १२, चामोर्शीं ९, एटापल्ली २१ अशा एकूण ४८ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञांकडून योग्य समुपदेशन होत असल्याने दारू सोडण्यासाठी रुग्णांना मदत मिळते.



