
जिल्हा प्रशासनाला निवेदन ; नियमित समायोजन आणि इतर मागण्यांची पूर्तता न झाल्याने आंदोलनाचा इशारा
गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १९ ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १४ मार्च २०२४ रोजी त्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचा शासननिर्णय (GR) जारी झाला होता. मात्र, सव्वा वर्षाचा कालावधी उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याशिवाय, मानधन वाढ, लॉयल्टी बोनस, ईपीएफ, विमा आणि बदली धोरण यांसारख्या मागण्याही प्रलंबित आहेत. ८ आणि १० जुलै रोजी आरोग्य मंत्र्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते, पण तेही पूर्ण झाले नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमधील विविध सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये JSSK, DEIC, RBSK, SNCU, NBSU, Blood Bank, Dialysis, लसीकरण सत्र तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपाची सर्व कामे बंद राहणार आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा जिल्हा समन्वयक जितेंद्र कोटगले यांनी दिला आहे.



