
देसाईगंज : धान उत्पादकांचे चुकारे, बोनस, कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य हमीभाव यांसारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट सरकार आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव करून देणे आहे. धान उत्पादकांच्या थकलेल्या बिलांचे (चुकारे) आणि बोनसचे त्वरित वाटप करावे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा. पीक विमा कंपन्यांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीची चौकशी करावी आणि त्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा. कृषी पंपांऐवजी सोलार पंप आणि स्मार्ट मीटरमुळे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करावे. अद्यापही न मिळालेल्या पीक नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शेतकरी, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.



