राज्यात भागीदारी संस्थांसाठी नवीन संकेतस्थळ सुरू ; ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’ला मिळणार चालना

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘२.०’ या उन्नत संकेतस्थळाचा शुभारंभ
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निबंधक, भागीदारी संस्था यांच्या ‘२.०’ या उन्नत संकेतस्थळाचा नुकताच शुभारंभ झाला. हे नवे संकेतस्थळ भागीदारी संस्थांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ सेवा देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे पोर्टल शासनाच्या ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’ उपक्रमांतर्गत ‘वन स्टॉप विंडो’ म्हणून काम करेल, ज्यामुळे उद्योगांच्या वाढीला चालना मिळेल.
नवीन ‘२.०’ संकेतस्थळ मागील ‘१.०’ संकेतस्थळाच्या मर्यादा दूर करून विकसित करण्यात आले आहे. अर्ज आणि कागदपत्रे कायमस्वरूपी क्लाउड स्टोरेजवर साठवली जातील, ज्यामुळे वेबसाइटची गती कमी होणार नाही. तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी महा-आयटीकडून दूरध्वनी सुविधा आणि तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे. युजर आयडी आणि पासवर्ड रिसेट करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज नाही. अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी आता ‘रेक्टिफिकेशन’ची सुविधा देण्यात आली आहे. ही या वेबसाईटची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
निबंधक, भागीदारी संस्था विभागाची स्थापना १९५८ मध्ये झाली होती आणि आतापर्यंत राज्यात आठ लाख भागीदारी संस्थांची नोंदणी झाली आहे. जून २०१२ पासून ‘maha.gov.in’ या संकेतस्थळाद्वारे नोंदणी प्रक्रिया ‘पेपरलेस’ सुरू झाली. त्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘१.०’ संकेतस्थळ सुरू झाले. या नव्या ‘२.०’ संकेतस्थळामुळे अर्ज सादर करणे, ऑनलाइन शुल्क भरणे आणि डिजिटल प्रमाणपत्र मिळवणे यासारख्या प्रक्रिया अधिक सोप्या होणार आहेत.
कार्यक्रमास मुख्य सचिव राजेशकुमार, राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार, उदय शुक्ल, भागीदारी संस्थेच्या निबंधक कविता सत्यनारायण नावंदर आदी उपस्थित होते.



