
नागपूर : नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांच्या विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर-गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) राबवण्याचा तसेच त्यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी ३ हजार १६२ कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे.
सध्या नागपूरहून गोंदियाला पोहोचण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. हा नवा १६२.५७७ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग सुरू झाल्यावर प्रवासाचे अंतर १५ किमीने कमी होऊन प्रवासाचा कालावधी केवळ सव्वा तासावर येणार आहे. हा महामार्ग नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील एकूण १० तालुके आणि ११५ गावांतून जाणार आहे. या महामार्गावर २६ उड्डाणपूल, ८ प्राण्यांसाठी अंडरपास, १५ मोठे आणि ६३ लहान पूल तसेच ७१ कालवा क्रॉसिंग्जचा समावेश असेल. तसेच, गवसी, पाचगाव, ठाना, रोटरी, पांजरा, पालडोंगरी, लोहरी आणि सावरी अशा आठ ठिकाणी इंटरचेंजची सोय केली जाणार आहे.
हा द्रुतगती महामार्ग नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचाच भाग असणार आहे. या विस्तारामुळे विदर्भातील दुर्गम, मागास आणि आदिवासीबहुल भागांना थेट मुंबईशी जोडले जाईल. या कनेक्टिव्हिटी मुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळेल.
या महामार्गामुळे या भागातील आदिवासी क्षेत्र मुख्य प्रवाहाशी जोडले जाईल, ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. तसेच, नवीन उद्योग येण्याची शक्यता वाढेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



