खळबळजनक : गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह

दोन दिवसांपूर्वीच वडिलांनी केली होती आत्महत्या ; पोलिसांकडून तपास सुरू
बीड : बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वडिलांनंतर आता त्यांच्याच तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेहही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बीडजवळील इमामपूर रोड परिसरात दोन दिवसांपूर्वी जयराम बोराडे या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. बोराडे यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून बाहेर पडली होती, पण ती बेपत्ता झाली होती. पोलीस आणि कुटुंब दोन दिवसांपासून तिचा शोध घेत होते. गुरुवारी सकाळी, त्याच इमामपूर रोड परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्या चिमुरडीचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
जयराम बोराडे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या मुलीचाही त्याच ठिकाणी मृतदेह आढळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही आत्महत्या आहे की घातपात, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्रामीण पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. या दुहेरी मृत्यूमागील गूढ लवकरच उलगडेल अशी अपेक्षा आहे.



