
विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत पटकावले विजेतेपद; आता विभागीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार
गडचिरोली : जिद्द, मेहनत आणि संघभावनेच्या जोरावर गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. या विजयासह त्यांनी विभागीय स्तरावरील स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
कला व क्रीडा संचालनालय, पुणे आणि क्रीडा विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा प्रेक्षागार मैदानावर १४ वर्षांखालील विद्यार्थ्यांची ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता, पण गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या खेळाडूंनी त्यांच्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हितेश नागोसे, हर्षल गायपाल, सुजय जबादे, मोहित आमले, तन्मय घोडाम, क्षितिज पल्लो, अर्णव चौधरी, राजवीर मडावी, धनराज वेळदा, खुश धानोरकर, ध्रुव हलामी, गुणवंत शेंडे आणि हर्ष गुरनुले या विद्यार्थ्यांनी वेगवान धाव, अचूक पकड आणि चपळ बचावाचा उत्कृष्ट नमुना सादर केला.
क्रीडा प्रमुख भूपेंद्रसिंग चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या कठोर सरावामुळेच हे यश शक्य झाले. अंतिम सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना सहज हरवून विजयाचा चषक आपल्या नावे केला. खेळाडूंच्या या कामगिरीने विद्यालयाचा झेंडा आणखी उंचावला.
या विजयाबद्दल प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी संघाचे अभिनंदन केले आणि सांगितले की, “विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध सराव आणि भूपेंद्रसिंग चौधरी यांचे कठोर प्रशिक्षण हाच या विजयाचा पाया आहे.” पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनीही खेळाडूंच्या चिकाटीचे कौतुक केले. समस्त शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
आता हा विजयी संघ गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विभागीय स्तरावर करणार आहे. या खेळाडूंनी आगामी स्पर्धेसाठी अधिक परिश्रम घेण्याचा निर्धार केला असून, सर्वांच्या नजरा त्यांच्या पुढील कामगिरीकडे लागल्या आहेत.



