गरंजी टोला येथील कोंबडाबाजारावर पोलिसांची धाड ; ९२ जणांना घेतले ताब्यात

४६ दुचाकी, ५ चारचाकी वाहनांसह ४४.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात कोंबड्यांच्या झुंजी लावून जुगार खेळणाऱ्यांवर गडचिरोली पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. रेगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गरंजी टोला येथे टाकलेल्या धाडीत एकूण ९२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ४४ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी अवैध कोंबडा बाजारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, २१ सप्टेंबर रोजी धानोरा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकाने गरंजी टोला येथील जंगल परिसरात माओवादी विरोधी अभियान राबवत असताना कोंबड्यांची झुंज आणि जुगार सुरू असल्याचे पाहिले. त्यानंतर, लगेचच पोलीस पथकाने रेगडी पोलीस ठाण्याच्या मदतीने संयुक्तपणे धाड टाकली.

या कारवाईदरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून ९२ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण ४४,२६,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ४६ दुचाकी (किंमत १६.१० लाख), ५ चारचाकी वाहने (किंमत २६ लाख), ३१ मोबाईल फोन, १४ कोंबडे, ५ लोखंडी काती आणि ४२,९५० रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे.
या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध रेगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक, धानोरा अनिकेत हिरडे, विशेष अभियान पथकाचे सपोनि. विश्वास बागल, पोउपनि. ज्ञानेश्वर धुमाळ, पोउपनि. देवाजी कोवासे व अंमलदार यांनी पार पाडली.



