
गडचिरोलीत गौड कलार समाजाचा उपक्रम; महिलांनी १९ बतुकम्मा तयार करून काढली भव्य मिरवणूक
गडचिरोली : गौड कलार समाज, गडचिरोली, धानोरा, सावली आणि मुल तालुक्याच्या वतीने गडचिरोली शहरामध्ये डी.एस.आर. हॉल येथे २५ सप्टेंबर रोजी सरदार सर्वाई पापन्ना गौड यांची ३७५ वी जयंती आणि बतुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजात एकता आणि संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कुलदैवत रेणुका माता, बतुकम्मा माता आणि सरदार सर्वाई पापन्ना गौड यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी समाजातील महिलांनी रंगीबेरंगी फुलांचा साज करून १९ बतुकम्मा आणि गौरम्मा तयार केले. पूजा-अर्चना झाल्यावर सर्व महिलांनी सुमधूर बतुकम्मा संगीताच्या तालावर तल्लीन होऊन नृत्य केले, ज्यामुळे संपूर्ण हॉलमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमात श्रीनिवास दुल्लमवार यांनी सरदार सर्वाई पापन्ना गौड यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. इ.स. १६५० मध्ये जन्मलेल्या पापन्ना गौड यांनी १७ व्या शतकात आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. औरंगजेबाच्या काळात त्यांनी शूर वीर योद्धा म्हणून नाव कमावले आणि गोळकोंडा राज्यात दोन मुघल साम्राज्यांचा सामना केला. त्यांनी समाजातील गरजू लोकांसाठी १८ वाड्या बांधून निवाऱ्याची सोय केली होती.
श्रीनिवास दुल्लमवार यांनी समाजाला एकत्र येऊन आपली शक्ती, एकता, संस्कृती, रूढी आणि परंपरा जतन करण्याचे आवाहन केले, जेणेकरून नवीन पिढीला आपली संस्कृती टिकवता येईल.

त्यानंतर महिलांनी तयार केलेली बतुकम्मा आणि गौरम्मा देवी डोक्यावर घेऊन गडचिरोली शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला आणि पुरुषांनी बतुकम्मा देवीच्या गाण्यांवर ताल धरला, जयघोष केला आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहाने देवीला सार करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य तलावात बतुकम्माचे विसर्जन करण्यात आले आणि सर्वांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेश बोडगेवार, मल्लेश वंगेवार, श्रीनिवास दुल्लमवार, नरसिंग गणवेणवार, रमेश गणवेणवार, ममता गणवेणवार, लक्ष्मी ताडपल्लीवार, वैशाली, रूपा, पदमा यांच्यासह सर्व समाज बांधव आणि महिलांनी परिश्रम घेतले.



