
‘सायबर जनजागृती माह’ उपक्रमाअंतर्गत आयोजन ; ऑक्टोबर महिन्यात विविध सायबर जनजागृती कार्यक्रम
गडचिरोली : दिवसेंदिवस वाढत्या सायबर अपराधांना आणि इंटरनेट फसवणुकीला आळा घालण्यासाठी, केंद्रीय गृह मंत्रालय आणि १४सी (Indian Cyber Crime Coordination Centre) यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर २०२५ हा महिना ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून साजरा केला जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य ‘सायबर जनजागृती सायकल रॅली’ चे आयोजन करण्यात आले.
पोलीस कवायत मैदान, गडचिरोली येथून सुरुवात झालेली ही सायकल रॅली ट्रेंड्स मॉल, धानोरा रोडपर्यंत गेली आणि शेवटी शहिद पांडु आलाम सभागृह येथे समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच सुमारे ३०० पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला.
या रॅलीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, सायबर फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. सायबर जनजागृती महिन्यात गडचिरोली पोलीस दल विविध जनजागृती उपक्रम राबवणार आहे. यात शाळा आणि महाविद्यालयांमधील जनजागृती मोहिमा, कार्यशाळा व ऑनलाईन वेबिनार्स, सोशल मिडिया प्रचार मोहीम यांचा समावेश आहे. या उपक्रमांद्वारे सायबर सुरक्षिततेचा संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व नागरिकांना या सायबर जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी नागरिकांना ओटीपी (OTP) किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही न सांगता सतर्क राहण्यास सांगितले. तसेच, कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीस बळी पडल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३०/१९४५ वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे महत्त्वपूर्ण आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोनि. अरुण फेगडे, सायबर पोलीस स्टेशनच्या मपोउपनि. नेहा हांडे तसेच सर्व शाखांच्या अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.



