
७ ते १८ ऑक्टोबर दरम्यान विशेष सर्वेक्षण मोहीम
गोंदिया : जंगलव्याप्त आणि अतिवृष्टीमुळे पाण्याचे डबके साचलेल्या जिल्ह्यात हिवताप (मलेरिया) आणि डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेऊन, जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाने ‘एक गाव, एक दिवस’ या संकल्पनेवर आधारित विशेष सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. दिनांक ७ ते १८ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा उद्देश किटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवणे आणि समाजात जनजागृती करणे हा आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी विशेष आवाहन केले आहे की, दिवाळी सणानिमित्त कामानिमित्त बाहेरगावाहून स्वगृही परत आलेल्या मजुरांनी तातडीने रक्ताची तपासणी करून घ्यावी. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत स्थलांतरामुळे डेंग्यू व हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी सांगितले की, मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी डासांसोबतच डास अळी नष्ट करणे महत्त्वाचे आहे.
या विशेष सर्वेक्षण मोहिमेदरम्यान गावपातळीवर बाहेरगावाहून परत आलेल्या व्यक्तींचा दैनंदिन शोध घेणे. डासोत्पत्ती स्थानकांमध्ये डी-लार्वा फवारणी आणि गप्पी मासे सोडणे. एक दिवस कोरडा दिवस पाळणे आणि साचलेले पाणी रिकामे करणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक असल्यास धूर फवारणी करणे. इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत:
डॉ. विनोद चव्हाण यांच्या कल्पक विचारातून साकारलेल्या या ‘एक दिवस एक गाव’ अभियानात आरोग्य कर्मचारी, आशासेविका, गावकरी आणि पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन जनजागृती करण्याचे आवाहन डॉ. गोल्हार यांनी केले आहे. या अभियानामुळे हिवताप आजारावर नियंत्रण मिळवून गावे मलेरियामुक्त होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



