क्राईमगडचिरोलीछत्तीसगडमुख्य बातमीविदर्भ

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘मोस्ट वॉन्टेड’ जहाल नक्षलवादी नेता माडवी हिडमा चकमकीत ठार!

सुरक्षा दलाची त्रि-सीमेवर मोठी कारवाई ; हिडमाच्या पत्नीसह सहा नक्षल्यांचा खात्मा ; नक्षल चळवळीचा कणा मोडला

गडचिरोली : शेकडो सुरक्षा जवान आणि सामान्य नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेला, ‘पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी’चा (PLGA) प्रमुख आणि नक्षलवादी चळवळीतील ‘मोस्ट वॉन्टेड’ नेता माडवी हिडमा (४४) याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवरील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ही निर्णायक कारवाई केली. या कारवाईत हिडमाची पत्नी राजे उर्फ राजक्का हिच्यासह एकूण सहा नक्षल मारले गेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा त्रि-सीमा परिसर नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो. या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचे अनेक गुप्त तळ असल्याची पक्की माहिती सुरक्षा दलांना मिळाली. या माहितीच्या आधारावर अत्यंत सुनियोजित पद्धतीने मोहीम आखण्यात आली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास जवानांनी नक्षलवाद्यांच्या तळाला वेढा घातला असता, दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. या चकमकीत माडवी हिडमा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. घटनास्थळावरून किमान सहा नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

माडवी हिडमा हा नक्षलवादी चळवळीतील सर्वात क्रूर चेहरा होता. १९८१ मध्ये छत्तीसगडमधील सुकमा येथे जन्मलेला हिडमा, अत्यंत कमी वयात ‘पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी’च्या एका प्रमुख बटालियनचा म्होरक्या बनला. त्याच्या क्रूर रणनीतीमुळे तो नक्षलवाद्यांच्या ‘केंद्रीय समिती’चा सर्वात तरुण सदस्य बनला होता. बस्तरच्या आदिवासी भागातून या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेत पोहोचणारा तो एकमेव नेता होता.

हिडमाच्या डोक्यावर विविध राज्यांमध्ये ५ कोटींहून अधिक बक्षीस होते. त्याच्या मृत्यूमुळे बस्तर, आंध्र आणि तेलंगणा पट्ट्यातील नक्षलवादी चळवळीचा कणाच मोडल्याचे मानले जात असून, नक्षलविरोधी मोहिमेतील हे सर्वात मोठे आणि निर्णायक यश मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button