
शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे घटना उघड ; वन्यजीव बचाव दल आणि वनविभागाच्या पथकाकडून सुरक्षित जेरबंद
लाखांदूर : वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र दांडेगावअंतर्गत येणाऱ्या खोलमारा (जुना) येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे या बिबट्याचे प्राण वाचले आणि वनविभागाने तातडीने बचावकार्य करून त्याला सुरक्षित बाहेर काढले.
: शेतकरी ईश्वर भिवाजी डोये हे आपल्या शेतातील विहिरीतील पाणी सुरू करण्यासाठी मोटरपंप चालू करण्याचा प्रयत्न करत होते. पंप सुरू न झाल्याने ते तपासणीसाठी विहिरीत पाहू लागले, त्यावेळी त्यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसून आले. शेतकऱ्याने लगेच वनविभागास माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी पी. बी. चन्ने यांच्यासह वनकर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बचावकार्यासाठी भंडारा येथील वन्यप्राणी बचाव दल (शीघ्र कृती दल) तसेच एन.एन.टी.आर.चे शीघ्र कृती पथक बोलावण्यात आले. पथकांनी जाळे बसवून विहिरीतील बिबट्यास सुरक्षितपणे जेरबंद केले. बचावकार्य करताना नागरिकांच्या जमावाचा अडथळा येऊ नये यासाठी वनविभागाने विशेष काळजी घेतली होती. पशुधन विकास अधिकारी मेघराज तुलावी यांनी बिबट्याची तपासणी करून तो शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याची खात्री दिल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
हे बचावकार्य उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संजय मेंढे, सचिन निलख आणि प्रमुख बचावदल चालक अनिल शेळके यांच्यासह स्थानिक वनरक्षक व गावकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण झाले.



