
गडचिरोली : नगरपरिषद निवडणूक दारुमुक्त व पारदर्शकरित्या पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या मोहीम राबवून दोन विक्रेत्यांकडून देशी व विदेशी दारू जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे.
गडचिरोली नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या काळात मतदारांना दारूचे आमिष दाखविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सोबतच दंगे होऊन शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूक काळात शहरात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिस विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ टीमने दारू विक्रित्यांविरोधात मोहीम राबवली. शहरातील विविध वार्डातील एकूण 26 दारूविक्रत्यांच्या घरी धाड टाकून तपासणी केली. सोबतच अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, फुले वार्डातील मंजुषा सत्तया वांगेवार, रसिका प्रकाश दुमाने या दोन महिलांच्या घराची तपासणी केली असता देशी व विदेशी दारू मिळून आली. याप्रकरणी संबंधित दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत 5 पोलीस अधिकारी, 50 पोलीस शिपाई व मुक्तीपथ टीम सहभागी होती. या कृतीमुळे शहरातील विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून दारूविक्रत्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.



