
विशेष शिबिरात २०० बालकांची तपासणी; ४१ बालकांना शस्त्रक्रियेची गरज, तज्ञांकडून मोफत मार्गदर्शन
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागातील बालकांना आता हृदयरोगाच्या निदानासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे अत्याधुनिक ‘बाल २डी-ईको’ मशीनचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या सुविधेमुळे जन्मतः हृदयविकार असलेल्या बालकांचे वेळीच निदान होऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरबीएसके–डीईआयसी कार्यक्रमाच्या माध्यमातून ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. याअंतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील “जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र” (DEIC) हे हृदयरोगाचे निदान आणि पुढील शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, “दुर्गम व आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात तज्ञ आरोग्य सेवा जिल्हास्तरावरच उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. पालकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या बालकांचे आरोग्यपूर्ण भविष्य सुरक्षित करावे.”
मशीनच्या उद्घाटनानिमित्त आयोजित विशेष तपासणी शिबिरात नागपूरचे प्रसिद्ध बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद अंबदकर व त्यांच्या पथकाने सेवा दिली. २०० बालके व विद्यार्थ्यांची २डी-ईको चाचणी करण्यात आली. तपासणीअंती ४१ बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निष्पन्न झाले आहे. निदान झालेल्या बालकांच्या पालकांना तज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पात्र बालकांना पुढील उपचारांसाठी (Tertiary Care) डीईआयसीमार्फत आवश्यक ती मदत दिली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी रुग्णालयाच्या नवनिर्मित इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली आणि विविध विभागांना भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. या शिबिराच्या यशासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार साळुंखे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पेंदाम आणि डीईआयसी व्यवस्थापक प्रशांत खोब्रागडे यांनी विशेष परिश्रम घेतले.



